इस्लामाबाद: आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढतच आहेत. पाकिस्तान सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. दैनंदिन खर्चासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही. यामुळे पाकिस्तानसमोरचं आर्थिक संकट अधिक गहिरं होत असताना जनतेच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. पाकिस्तानातील महागाई दरानं गेल्या पाच वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. मार्च महिन्यात पाकिस्तानातील महागाई दर 9.4 टक्क्यांवर डाऊन पोहोचला. वाढती महागाई, घसरता रुपया आणि तेलाच्या वाढत्या किमती यामुळे पाकिस्तान मेटाकुटीला आला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेनं व्याज दरात वाढ करत तो 10.75 टक्क्यांवर नेला आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागानं (पीबीएस) दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्ये महागाई दर 9.4 टक्क्यांवर गेला. या काळात जगभरात खनिज तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई वाढल्याचं पीबीएसनं म्हटलं. पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन महिन्यात देशातील ताज्या भाज्या, फळं आणि मांसाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. जुलै ते मार्च या कालावधीत महागाई दरात 6.97 टक्क्यांनी वाढ झाली. सरकारनं गेल्या वर्षी महागाई दर 9 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचं लक्ष्य निश्चित केलं होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून महागाईत सातत्यानं वाढ सुरू आहे. 2017-18 मध्ये पाकिस्तानातील महागाईचा दर 3.92 टक्के होता. तर 2016-17 मध्ये पाकिस्तानमधील महागाई दर 4.16 टक्के होता. रुपयाच्या मूल्ल्यात होत असलेली सातत्यपूर्ण घसरण आणि खनिज तेलाच्या दरात होत असलेली वाढ यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेनं व्याज दरात वाढ केली. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं व्याज दरात अर्धा टक्क्यानं वाढ केली. त्यामुळे व्याज दर 10.75 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. हा गेल्या सहा महिन्यातील उच्चांक आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात; बेसुमार महागाईनं जनतेची वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:01 PM