Pakistan Iran : भारताचा शेजारील देश पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांसाठी सुरक्षित देश राहिला आहे. पाकिस्तान थेटपणे मान्य करत नसला तरी, ते नेहमी दहशतवादी संघटनांना निधी पुरवतात. पण आता हेच दहशतवादी पाकिस्तानसाठीच अडचणीचे ठरत आहेत. अलीकडेच इराणने पाकिस्तानच्या भूमीवर हवाई हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (16 जानेवारी) रात्री इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना 'जैश-ऐ-अदल'च्या ठिकाणांवर मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कारवाईचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
जाणून घ्या जैश-ए-अदल संघटनेबद्दल...जैश-ऐ-अदल याआधी जागतिक दहशतवादी संघटना जुंदल्लाहचा एक भाग होती. जैश-ऐ-अदल म्हणजे 'न्यायाची सेना'. ही सुन्नी सलाफी फुटीरतावादी दहशतवादी संघटना आहे. जैश-ऐ-अदल या दहशतवादी संघटनेचे मुख्य ठिकाण पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आहे. 2012 पासून या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानात मजबूत अस्तित्व आहे.
इराणच्या हल्ल्याचे कारण काय?इराण हा शिया बहुसंख्य देश आहे. पाकिस्तानातील सुमारे 95% लोक सुन्नी आहेत, त्यामुळे पाकिस्तानातील सुन्नी संघटना इराणला विरोध करतात. याशिवाय बलुचिस्तानची दहशतवादी संघटना जैश-अल-अदल इराणच्या सीमेत घुसून तेथील लष्करावर अनेकदा हल्ले करते. या दहशतवादी संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराणने पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. जैश-ऐ-अदलचे बहुतांश दहशतवादी इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधून आलेले आहेत.
सिस्तान प्रांतात इराणची पाकिस्तानशी 959 किमी लांबीची सामायिक सीमा आहे. इराणमधील शिया समुदाय येथे राहतो. इराणच्या सीमावर्ती प्रांतांमध्ये जैश-ऐ-अदलशी यापूर्वीही चकमक झाली आहे. पण आता इराणने पाकिस्तानी भूमीवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले करणे ठरवले आहे. गेल्या महिन्यात सिस्तान बलुचिस्तानमधील इराणी पोलिस ठाण्यावर जैशने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे बोलले जात आहे.