टोरंटो – कॅनडामध्ये मूळचे पाकिस्तानी असलेल्या मुस्लीम कुटुंबाला जाणूनबुजून ठार केल्यानं संपूर्ण जगभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या क्रूर घटनेत ४ लोकांचा मृत्यू झाला असून एक जण जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या घटनेची निंदा करत मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केले आहे. पाश्चिमात्य देशात इस्लामोफोबिया वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुस्लीम कुटुंबाच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही इस्लामोफोबियावर निशाणा साधला आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका ट्रक ड्रायव्हरनं मुस्लीम असल्या कारणाने एका कुटुंबाला टार्गेट केले. ही घटना लंडनच्या औंटारियो शहरात रविवारी रात्री घडली आहे. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका युवकाला मॉलच्या परिसरातून अटक केलं आहे. एका वळणावर ट्रकचालकाने पीडित कुटुंबाला रस्त्यावर चिरडलं.
शहराचे महापौर एड होल्डर म्हणाले की, ही मुस्लिमांविरोधात सामूहिक हत्या केल्याची घटना आहे. मुस्लिमांबद्दल द्वेष भावनेतून आरोपीनं क्रूर घटना केली. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये मूळचे पाकिस्तानी असलेले कॅनडियन नागरिक सलमान अफजल, त्यांची पत्नी मदीहा, मुलगी यमूना आणि ७४ वर्षाची आजी आहे. त्यांचे नाव समोर आलं नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचं नाव फैयाज आहे. घटनेत बळी पडलेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांनी एक निवेदन जारी करत द्वेष आणि इस्लामविरोधात असं कृत्य रोखण्यासाठी एकसाथ उभं राहण्याची गरज आहे.
निवेदनात म्हटलंय की, जे लोक सलमान आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतात त्यांना माहित्येत ते चांगले मुस्लीम कुटुंब होतं. कुटुंबातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत होता. त्यांची मुलंही चांगल्या शाळेत शिक्षण घेत होती. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी बॅरिगेट्स उभे करून पुरावे गोळा करत आहेत. मुस्लीम असल्यानेच त्यांना टार्गेट केले गेले असं पोलीस प्रमुख स्टिफन विलियम्स म्हणाले.
कॅनिडियन पंतप्रधानांनी साधला निशाणा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट करून म्हटलं की, या संतापजनक हल्ल्याबद्दल मी लंडनच्या महापौरांची चर्चा केली आहे. इस्लामोफोबिया विरोधात लढण्यासाठी प्रत्येक साधनांचा वापर केला जाईल. देशभरातील मुस्लिमांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. आमच्या समाजाता इस्लामोफोबियासाठी कुठेही जागा नाही. अशा घृणास्पद प्रकार बंद व्हायलाच हवेत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.