पाकिस्तानमधील बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेटामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट क्वेटातील प्रसिद्ध सेरेना हॉटेलजवळ झाला. हा स्फोट पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करून घडवण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एप्रिल महिन्यात या सेरेना हॉटेलमध्ये चिनी राजदूत थांबले होते. त्यावेळीही हॉटेलच्या पार्किंग भागात स्फोट झाला होता. स्फोटाच्या वेळी चिनी राजदूत हॉटेलमध्ये नव्हते.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला. एका मोटारसायकलमध्ये बॉम्ब लावण्यात आला होता. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण भागामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. दहशतवादी बलुचिस्तानमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी म्हटले. शांतता असलेल्या बलुचिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जाम कमाल खान यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादी प्रवृत्ती प्रांतातील शांतता भंग करू इच्छित असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्याचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार आणि चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आलं आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या गणेश मंदिरात बुधवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल
मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. लाहोरपासून 590 किमीवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे मुख्य आरोपीसह 50 जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड झाल्याची घटना लाजिरवाणी असल्याची भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.