इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते.
पाकिस्तान सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले की, दहशतवाद्यांविरोधात कारवाईत करण्यात येत आहे. यासाठी सरकारने 182 मदरशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे. तसेच, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांविरोधात आधीपासून कारवाई करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येत ही कारवाई करण्यात येत नाही, असे पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात सक्रिय असणारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानावर भारतासह जगभरातील अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दवाब टाकला होता. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन अशा अनेक देशांचा समावेश होता.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.