लाहोर - बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी पाकिस्तानातील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने नवाझ शरीफ त्यांची मुलगी आणि जावयाविरोधात भ्रष्टाचारा प्रकरणी आरोप निश्चित केले. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने जी माहिती दिली त्या आधारे आरोप निश्चित करण्यात आले.
67 वर्षीय नवाझ शरीफ त्यांची मुलगी मरियम आणि जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या विरोधात लंडनमधल्या मालमत्ते प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नवाझ शरीफ आणि त्यांचे वकिल ख्वाजा हॅरीस सध्या परदेशात आहेत. तिघांनीही स्वत:वरील आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया स्थगित करावी यासाठी कॅप्टन सफदर यांच्यावतीने त्यांचे वकिल अमजद परवेझ यांनी अर्ज केला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी शरीफ यांच्या कायदेशीर टीममधील दुस-या वकिला आयशा हमीद यांनी केली होती. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (नॅब) शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे वेगवेगळे आरोप केलेत त्या विरोधात शरीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर निकाल लागेपर्यंत आरोप निश्चित करु नये असे आयशा हमीद यांनी मागणी केली होती. पण कोर्टाने तो सुद्धा अर्ज फेटाळून लावला.
सोमवारी नऊ ऑक्टोंबरला शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने अटक केली होती. पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात आली. सोमवारी पहाटे शरीफ यांची मुलगी मरियम आणि जावई सफदर हे दोघे कतार एअरलाईन्सच्या विमानाने बेनझिर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. मरियम यांच्या स्वागतासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरीफ कुटुंबियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही सुरु होती. याच दरम्यान नॅबच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक विमानतळावर पोहोचलं आणि त्यांनी सफदर यांना अटक केली.
काय आहे पनामा पेपर्सप्रकरण ?पनामा या देशातील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११. ५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रं उघड झाली होती. यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, सिनेस्टार, क्रिकेटर्स यांनी मालमत्ता लपवण्यासाठी आणि कर चुकवण्यासाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवला होता.