भारतीय समजून पाकिस्तानी जनतेने आपल्याच वैमानिकाला ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 03:26 PM2019-03-02T15:26:33+5:302019-03-02T15:27:09+5:30
विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानातील वैमानिकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरूप मायदेशी परतले आहेत. मात्र अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानातील वैमानिकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफ-16 विमान मिग-21 ने केलेल्या हल्ल्यात पाडले गेल्यानंतर या विमानातील वैमानिकाने पॅराशूटच्या बाहेर उडी घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या हद्दीत सुखरूपरीत्या उतरलेल्या या वैमानिकाला पाकिस्तानी नागरिकांना भारतीय वैमानिक समजून जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
विंग कमांडर शहजाजुद्दीन असे या दुर्दैवी वैमानिकाचे नाव आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने बुधवारी भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भारतीय हवाई दलासोबत उडालेल्या चकमकीत भारताच्या मिग 21 विमानाने पाकिस्तानच्या एका एफ-16 विमानाची शिकार केली होती. तर भारताचे हे मिग 21 विमानही कोसळले होते. त्यादरम्यान, मिग-21 मधील वैमानिक अभिनंदन वर्धमान पाकिस्ताच्या तावडीत सापडले होते. तर एफ-16 विमानातील वैमानिक शहजाजुद्दीन हे यशस्वीरीत्या पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. मात्र शहजाजुद्दीन हे भारतीय वैमानिक असावेत, अशी समजूत करून घेत पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली. मात्र तो भारतीय नाहीत तर पाकिस्तानी वैमानिक आहे हे समजले तोपर्यंत फार उशीर झाला होता. मात्र या प्रकाराला पाकिस्तानने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या हवाई चकमकीनंतर आपण भारताची दोन विमाने पाडल्याचा तसेच दोन वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. मात्र हा खोटा दावाच पाकिस्तानी वैमानिकाच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मृत पाकिस्तानी वैमानिकाच्या कुटुंबीयांच्या लंडनस्थित निकटवर्तीयाने यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.