नवी दिल्ली : रमझानच्या पवित्र महिन्यातच पाकिस्तानमध्येमहागाईने कहर केला आहे. केळी दीडशे रुपये डझन, मटण ११०० रुपये किलो, चिकन ३२० रुपये किलो, दूध १२० ते १८० रुपये लीटर पर्यंत कडाडले आहे.
पाकिस्तानात एका डॉलरची किंमत १४८ रुपयांपर्यंत गेली आहे. पाकिस्तानी चलन आशियामधील १३ अन्य चलनांच्या तुलनेत सर्वात वाईट अस्वथेत आहे. पाकिस्तानी चलनात २० टक्के घसरण झाली आहे. महागाईने मागचे सर्व उच्चांक मोडले आहेत. मार्चमध्ये महागाईचा दर ९.४ टक्के होता.एक डझन संत्री ३६० रुपये तर लिंबू आणि सफरचंदाच्या किंमती ४०० रुपये किलोपर्यंत थडकल्या. गेल्या आठवड्यातच सरकारने स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ केली. त्यामुळेही अन्य वस्तुंची भाववाढ झाली. स्थानिक लोकांनी महागाईबद्दल सरकारवर आगपाखड केली आहे.
मार्चच्या तुलनेत कांद्याच्या किंमती सुमारे ४० टक्के, टोमॅटो १९ टक्के, चिकन १६ टक्के, मूग डाळ १३ टक्के आणि फळफळावळ १२ टक्के वाढले. गुळ व साखर ३ टक्के वधारली. मसाले व डाळी, तूप, तांदूळ, बेकरी उत्पादने, पीठ, खाद्यतेल, चहा, गहू यांच्या किंमती सुध्दा एक ते सव्वा टक्के वाढले आहेत. उमर कुरैशी या नागरिकाने ही माहिती व्ट्टि करुन दिली. ते पॉझिटिव्ह मीडिया कम्यूनिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांचे २ लाखांहून अधिक फॉलोअर आहेत.कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हे कारणपाकिस्तान ब्यूरो आॅफ स्टॅटिस्टिक्सच्या (पीबीएस) माहितीनुसार, मार्च मध्ये उपभोक्ता मूल्य सूचकांकावर आधारित महागाई वाढून ९.४ टक्क्यांवर गेली. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हे पाकिस्तानमधील महागाईचे मुख्य कारण आहे. ३ महिन्यांपासून भाजीपाला, मांस व फळांचे भाव शहरांमध्ये वाढत आहेत. जुलैपासून सरासरी महागाई ६.९७ टक्के वाढली आहे.