अंशत: व्यवसाय सुरु करण्याची अमेरिकेत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:05 AM2020-04-30T04:05:42+5:302020-04-30T04:05:51+5:30
रुतलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
वॉशिंग्टन : भारतामधील अनेक राज्ये लॉकडाऊन वाढविण्याच्या मानसिकतेत असताना जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची (कोविड-१९) संख्या असलेल्या अमेरिकेत मात्र कोणते व्यवसाय सुरूकरता येईल, याबाबत विचार करण्यात येत आहे. अनेक राज्यांनी प्रभावित क्षेत्रानुसार अंशत: व्यवसाय आणि व्यापार सुरू करण्याची तयारी केली आहे. रुतलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील केशकर्तनालय, कपड्यांची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. पंतप्रधानांनी राज्यांना लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली आहे. पंतप्रधानांनी नुकताच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्या वेळी अनेकांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केल्याचे समजते.
जगभरात सर्वाधिक १० लाखांहून अधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. येथील अनेक राज्यांनी मात्र निर्बंध कसे शिथिल करता येतील, याबाबत चाचपणी सुरू आहे. अमेरिकेत सर्वाधित बाधित न्यू यॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमधील कमी बाधित असलेल्या भागामध्ये १५ मेनंतर निर्बंध शिथिल करता येतील का, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. जॉर्जियाने निर्बंध शिथिल करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. लुझियानामधे पहिल्या टप्प्यात काही व्यवसाय सुरू होणार आहेत. मेरीलँडमध्ये पहिल्या टप्प्यात लघु व्यवसाय, रेस्टॉरंट आणि कमी धोका क्षेत्रातील उद्योग सुरू केले जातील. पेनसिल्वियानामधे ८ मेपासून लाल, पिवळा आणि हिरव्या क्षेत्रानुसार निर्बंध शिथिल केले जातील. अमेरिकेतील यूएसए टुडे या आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.