फायझरच्या लसीमुळे महिलांना येईल दाढी, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 07:18 AM2020-12-22T07:18:34+5:302020-12-22T07:28:09+5:30
Pfizer vaccine :बाेल्साेनाराे यांनी लसीबाबत चिंता व्यक्त करताना कंपनीने काेणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे स्मरण करून दिले आहे.
ब्राझिलिया : काेराेनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये संपूर्ण जगाचे लक्ष फायझर-बायाेएनटेकने विकसित केलेल्या लसीकडे लागले आहे. मात्र, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बाेल्साेनाराे यांनी या लसीवर अविश्वास व्यक्त केला आहे. लसीच्या दुष्परिणामांमुळे स्त्रियांना दाढी येऊ शकते किंवा तुम्ही मगरही हाेऊ शकता, असा विचित्र दावा त्यांनी केला आहे.
बाेल्साेनाराे यांनी लसीबाबत चिंता व्यक्त करताना कंपनीने काेणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे स्मरण करून दिले आहे. काेणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांसाठी कंपनी जबाबदार नसल्याचे फायझरच्या कंत्राटात लिहिल्याचे बाेल्साेनाराे म्हणाले. त्यामुळे तुम्ही मगरीमध्ये रूपांतरित झालात तर ती तुमची समस्या आहे. तुम्ही सुपर ह्यूमन बनले, महिलांना दाढी आली किंवा वेगळ्या आवाजात बाेलायला सुरुवात केली तरीही कंपनीला काहीही घेणे-देणे राहणार नाही, असे टीकास्त्र बाेल्साेनाराे यांनी साेडले आहे. त्यांनी स्वत: ही लस टाेचून घेण्यास नकार दिला आहे.
ब्रिटन, अमेरिकेसह काही देशांनी फायझरच्या लसीला मान्यता देऊन लसीकरणास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बाेल्साेनाराे यांनी ब्राझीलच्या जनतेच्या मनात भीती निर्माण केली आहे. (वृत्तसंस्था)