तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवरतालिबानचा ताबा आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. यासाठी विमान हा एकमात्र पर्याय आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक विमानतळावर येऊन कोणत्याही फ्लाइटमध्ये चढून देशातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत.
काही लोक अफगाणिस्तानमधून निघून जाण्यात यशस्वीही झालेत, पण काही अजूनही त्यांच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन दिवसांपूर्वी एक फोटो समोर आला होता. त्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाने ६०० हून अधिक लोक बसलेले दिसत होते. मात्र हा फोटो अफगाणिस्तानमधील नसून २०१३ सालचा फिलिपिन्समधील फोटो आहे.
मूळ फोटो फिलिपिन्समधील टॅक्लोबान शहरावर विनाशकारी चक्रीवादळ धडकल्यानंतर काही दिवसांनी यूएस एअरफोर्सकडून तिथे अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यावेळचा आहे. वृत्तसंस्था राऊटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. काही लोकांनी हा फोटो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला आहे. काबुल विमानतळाच्या बाहेर निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या भारतीय वायुसेनेने (IAF) रेस्क्यू ऑपरेशन केले, असाही दावा या फोटोसह काही लोकांनी केला होता. मात्र हा मूळ फोटो यूएसएएफच्या वेबसाइटवर देखील आहे.
तिथल्या माहितीनुसार हा फोटो १७ नोव्हेंबर २०१३ रोजी सुपर टायफून हैयान वादळानंतर लष्करी विमान, सी -17 ग्लोबमास्टर III चा आहे. या विमानात ६७० पेक्षा जास्त टॅक्लोबान रहिवासी होते. हैयान चक्रीवादळाने ८ नोव्हेंबर २०१३ रोजी किनाऱ्यावरील प्रदेशात धुमाकूळ घालत हाहाकार केला होता आणि त्यामुळं या प्रांतातील टॅक्लोबान शहराची मोठी हानी झाली होती.
दरम्यान, अफगाणिस्ताना ततालिबानने ताबा मिळवल्यानंतर देश सोडणाऱ्यांच्या रांगा थांबायचे नाव घेत नाहीत. काबुल विमानतळावर अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. लोकांना कोणत्याही किंमतीत देश सोडून जायचे आहे. दोन दिवसांपूर्वीही एक धक्कादायक घटना काबूल विमानतळावर घडली होती. देश सोडून जाण्यासाठी विमानावर लटकलेल्या काही नागरिकांचा उंचीवरुन पडून मृत्यू झाला होता. त्याचा व्हिडिओही मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला.