कीव्ह : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सत्ता उलथविण्याचे कारस्थान रचण्यात आले असून, ते आता रोखता येणे अशक्य आहे, असे युक्रेनचे लष्करी अधिकारी मेजर जनरल किर्यिलो बुदानोव यांनी म्हटले आहे. मात्र, हे कारस्थान कोणी रचले याचा तपशील त्यांनी दिला नाही.
त्यांनी सांगितले की, रशिया व युक्रेनमधील युद्धाला येत्या ऑगस्टच्या मध्याला वेगळे वळण लागणार आहे. ते युद्ध या वर्षअखेरीस संपण्याची शक्यता आहे. या लढाईत रशियाचा पराभव झाल्यास पुतिन यांना सत्तेवरून हटविले जाईल. त्या प्रयत्नांना याआधीच सुरुवात झालेली आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांना आता रोखणे अशक्य आहे. व्लादिमीर पुतिन हे कर्करोग व इतर व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती फारशी चांगली नाही, असा दावा बुदानोव यांनी केला. युद्धप्रसंगी शत्रूपक्षाबद्दल अनेक गोष्टी पसरविल्या जातात. तसा प्रयत्न केलेला नाही. जी वस्तुस्थिती आहे, तीच आम्ही सांगत आहोत, असेही बुदानोव म्हणाले.
पुतिन आजारी असल्याच्या बातम्यांवर रशियाचे मौन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आजारी असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून अनेकदा येत असतात. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे स्वागत करायला आलेल्या पुतिन यांचे शरीर कंप पावत होते हे त्या भेटीच्या काही व्हिडिओंवरून लक्षात येते. पुतिन यांना पार्किन्सन झाला असल्याचा दावा आजवर अनेकांनी केला आहे.
अमेरिकी सिनेटरचा युक्रेनला पाठिंबा
अमेरिकी सिनेटमधील रिपब्लिकन नेते मिच मॅकोनेल यांच्यासह आणखी काही सिनेटरनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांची शनिवारी भेट घेऊन युद्धस्थितीबाबत चर्चा केली. अमेरिका युक्रेनच्या पाठी भक्कमपणे उभी आहे, असे मॅकोनेल यांनी जेलेन्स्की यांना सांगितले.
रशियाचा पराभव अटळ; नाटोचा दावा
युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाला अपेक्षेप्रमाणे आगेकूच करता आलेली नाही. अशीच स्थिती राहिली तर युक्रेन हे युद्ध जिंकण्याची शक्यता आहे, असा दावा नाटोचे उपसचिव मिर्सिया जिओआना यांनी केला आहे.
नाटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बर्लिन येथे बैठक झाली. युक्रेनला वाढीव मदत देणे, तसेच फिनलंड, स्वीडन व अन्य देशांना नाटोचे सदस्यत्व देण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मिर्सिया जिओआना यांनी सांगितले की, युक्रेनच्या युद्धामध्ये रशियाच्या बाजूने गोष्टी घडताना दिसत नाहीत. युक्रेनचे लष्कर व तेथील जनता आपल्या शत्रूविरोधात प्राणपणाने झुंज देत आहे. अशीच स्थिती राहिली, तर रशिया पराभूत होण्याची चिन्हे आहेत.
फिनलंड, स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. असे प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने याआधीच दिला आहे. डेन्मार्कने म्हटले आहे की, रशियाने दिलेल्या धमकीला नाटो भीक घालणार नाही व आणखी काही देशांना नाटोचे सदस्य करून घेण्यात येईल. (वृत्तसंस्था)