पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 01:04 PM2018-05-29T13:04:40+5:302018-05-29T13:04:40+5:30
भारत हा इंडोनेशियाचा दक्षिण आशियातील व्यापारातील सर्वात मोठा भागीदार असून जगातील चौथ्या क्रमांकांचा व्यापार भागीदार आहे. दोनेही देशांतील व्यापार 18.13 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे.
जाकार्ता- पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. आज ते इंडोनेशियासह तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून रवाना झाले आहेत. इंडोनेशिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी सहाय्य, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी संध्याकाळी त्यांचे जाकार्ता येथए आगमन होईल. हा दौरा तीन दिवसांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत इंडोनेशियातील भारतीय समुदायालाही भेटून संबोधित करतील.
जाकार्ता येथे उतरल्यावर बुधवारी नरेंद्र मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेतील असे भारताचे इंडोनेशियातील राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी सांगितले आहे. इंडोनेशियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उद्योजकांची बैठक, भारतीय उद्योगांसह विविध बैठकांमध्ये नरेंद्र मोदी आणि जोको विडोडो सहभागी होतील. दोन्ही देशांमध्ये उद्योगक्षेत्रात स्नेहपूर्ण संबंध वृद्धींगत होण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करतील.
इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी आणि दहशतवाद याविषयावरही हे दोन्ही नेते चर्चा करतील. सागरी सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा याविषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे असे रावत यांनी सांगितले. चीनला शह देण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, जपान या सदस्यांसह इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजीची स्थापना झाली आहे. नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या पूर्व आसियाच्या दौऱ्यावर असून इंडोनेशियाच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर ते मलेशियात क्वालालंपूर येथे जाऊन नवनिर्वाचित पंतप्रधान महाथिर मोहंमद यांची भेट घेतील. त्यानंतर सिंगापूरला जाऊन पंतप्रधान ली सेन लूंग यांची भेट घेतील.
भारत हा इंडोनेशियाचा दक्षिण आशियातील व्यापारातील सर्वात मोठा भागीदार असून जगातील चौथ्या क्रमांकांचा व्यापार भागीदार आहे. दोनेही देशांतील व्यापार 18.13 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे.