"दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 05:20 AM2021-09-26T05:20:34+5:302021-09-26T05:21:12+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा.

pm narendra modi speaks in united nations pakistan terrorism pdc | "दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो"

"दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो"

Next
ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा.

न्यू यॉर्क : अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी  होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला दिला.

संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात मोदी यांनी चीनवरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, आपले समुद्र हा मोठा वारसा आहे. जागतिक व्यापारासाठी समुद्रमार्ग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विस्तारवादी भूमिका घेणाऱ्यांपासून जगाने स्वत:चे रक्षण केले पाहिजे. जागतिक कायदे, मूल्ये, नियमांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. 

दहशतवादाचा इतर देशांविरोधात वापर करणाऱ्यांनाही या गोष्टीपासून धोका आहे. योग्यवेळी योग्य काम पूर्ण नाही केले तर ते काम असफल होते, हे आर्य चाणक्य यांचे वचन उद्धृत करत मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. 


अफगाणिस्तानमधील सध्याची स्थिती अतिशय संवेदनशील आहे. तेथील महिला, मुले, विद्यार्थिनी तसेच सर्व अल्पसंख्याकांना सध्या मदतीची नितांत गरज आहे. अफगाणिस्तान हे जगभरातील दहशतवाद्यांचे नंदनवन कदापि बनता कामा नये. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारताने सर्वात आधी बनविली डीएनए लस 
भारताने जगात सर्वात आधी डीएनए लस विकसित केली. ही लस १२ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. कोरोनाशी मुकाबला करण्याकरिता भारत आरएनए पद्धतीची, तसेच नाकावाटे घेता येणारी लस तयार करण्यात गुंतला आहे. 
जगातील सर्व लस कंपन्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती इथे सुरू करावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

चहा विकणारा झाला पंतप्रधान
एकेकाळी रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यासाठी वडिलांना मदत करणारा मुलगा आज पंतप्रधान या नात्याने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चौथ्यांदा भाषण करत आहे, ही भारतातील लोकशाहीची ताकद आहे असे सांगत भारत ही लोकशाहीची जननी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

Web Title: pm narendra modi speaks in united nations pakistan terrorism pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.