व्हॅटिकन सिटी : १८व्या शतकातील देवसहायम पिल्लई यांना पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले आहे. भारतातील एखाद्या सामान्य माणसाला अशा प्रकारे पहिल्यांदाच संतपदाचा बहुमान देण्यात आला आहे. व्हॅटिकन येथे रविवारी हा समारंभ झाला.
देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल करण्यात यावे अशी विनंती तामिळनाडू बिशप्स कौन्सिल, दी कॉन्फरन्स ऑफ कॅथॉलिक बिशप्स ऑफ इंडिया आदी संघटनांनी २००४ साली पोप यांना केली होती. त्यानंतर बऱ्याच प्रक्रिया पार पडून पोप फ्रान्सिस (८५ वर्षे) यांनी देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल केले. देवसहायम यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या चमत्कारांवर पोप फ्रान्सिस यांनी २०१४ साली शिक्कामोर्तब केले होते.
कोण आहेत देवसहायम पिल्लई?
१७४५मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर देवसहायम पिल्लई यांनी लॅझारस हे नाव धारण केले. त्यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ रोजी कन्याकुमारी जिल्ह्यात नायर कुटुंबात झाला. डच नौदल कमांडरने देवसहायम यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली तेव्हा ते त्रावणकोर संस्थानच्या दरबारात अधिकारी होते. सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे, अशी शिकवण देवसहायम प्रवचनांतून देत. त्यांच्या या प्रवचनांमुळे नाराज झालेल्या वर्गाच्या तक्रारीवरून देवसहायमना १७४९ साली अटक करण्यात आली. १४ जानेवारी १७५२ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.