भारतानं लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणं चीनसाठी चिडचिडीचं कारण बनलं आहे. भारत आता चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, यावर चीनची प्रतिक्रिया काय आहे? असा सवाल चिनी परराष्ट्र मंत्रालयाला करण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताचं नाव न घेता टीका केली. केवळ लोकसंख्या वाढवून फायदा मिळत नाही, तर त्यासाठी त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असली पाहिजे. सध्या आपल्याकडे ९० कोटी लोकांची वर्कफोर्स आहे, जी चीनच्या अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यास सक्षम आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
"मला तुम्हाला सांगायचं आहे की लोकसंख्येचा फायदा केवळ प्रमाणावर नाही तर गुणवत्तेवर देखील अवलंबून असतो. लोकसंख्या महत्त्वाची आहे परंतु त्यासोबत प्रतिभा असणं खूप महत्त्वाचं आहे. चीनची लोकसंख्या १.४ बिलियनपेक्षा अधिक आहे. कार्यरत असलेल्या वयाचं लोक सुमारे ९०० मिलियन आहेत. याशिवाय चीन आपल्या वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठीही प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिककित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली.
१९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.