वाॅशिंग्टन : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने एअर स्ट्राईक करुन हिशेब चुकता केला आहे. ड्राेनचा वापर करून ‘आयसिस’च्या खाेरासन गटाचे तळ उद्ध्वस्त केले. त्यात विमानतळावरील बाॅम्बस्फाेटांचा मास्टरमाईंड ठार झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या गटाचे अतिशय महत्त्वाचे दोन कमांडर ठार झाले असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे.
काबूलच्या विमानतळावर गुरुवारी दाेन भीषण बाॅम्बस्फाेट झाले. त्यातील मृतांचा आकडा २००च्या वर गेला. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’च्या खाेरासन गटाने स्वीकारली. हल्ल्यात अमेरिकेच्या १३ सैनिकांचाही मृत्यू झाला. यावरून संतप्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी हिशेब चुकता करू, असा इशारा ‘आयसिस’ला दिला हाेता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने एअर स्ट्राईक केला. अमेरिकेने ड्राेनच्या मदतीने नांगहार प्रांतात आयसिसच्या तळांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्य केले. (वृत्तसंस्था)
एअर स्ट्राईकसाठी रिपर ड्राेनचा वापर-
या एअर स्ट्राईकसाठी रिपर ड्राेनचा वापर करण्यात आला. सलग २७ तास उडण्याची या ड्राेनची क्षमता आहे. १७०० किलाे वजन उचलण्याची क्षमता असून अनेक प्रकारच्या शस्त्रांचा वापर रिपर ड्राेनमधून हाेऊ शकताे. या ड्राेनची जगात कुठेही रिअल टाइम माहिती पाठविण्याची क्षमता आहे.
पुन्हा हल्ल्याचा इशारा
काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला हाेण्याचा इशारा अमेरिकेने दिला. विमानतळाच्या प्रवेशद्वारांपासून सर्व अमेरिकन नागरिकांनी दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विमातनळावर पुन्हा गाेळीबार, चेंगराचेगरी
तालिबानने काबूल विमानतळाचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर काबूल विमानतळावर पुन्हा गाेळीबार झाला आहे. अमेरिकन सैनिकांनी त्यास प्रत्युत्तरही दिले आहे. गाेळीबारानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली. गर्दीला पांगविण्यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. गाेळीबारामागे तालिबानचा हात असल्याचा संशय आहे.
तालिबानने काबूल विमानतळाचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अतिरिक्त सैनिकांचीही तैनातीही तालिबानने केली आहे. अफगाण नागरिकांनी इतर देशांमध्ये पलायन करू नये, यासाठी तालिबानची दडपशाही सुरू आहे. तरीही विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी हाेत आहे.