थेरेसा मे यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:17 AM2017-11-09T11:17:16+5:302017-11-09T11:19:57+5:30
मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौ-यानंतर बुधवारी राजीनामा दिला आहे.
लंडन : मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौ-यानंतर बुधवारी राजीनामा दिला आहे. आफ्रिका दौ-यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी परत बोलावले होते. प्रीती पटेल यांनी इस्रायल दौ-यात पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक अधिका-यांच्या भेटी घेतल्या होत्या. आपल्या राजीनाम्यासंदर्भात सांगताना प्रीती पटेल म्हणाल्या की, ''मंत्री परिषदेत काम करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. तथापि, एक मंत्री म्हणून ज्या उच्च परंपरा पाळण्याचे संकेत आहेत, ते मात्र माझ्या कार्याला अनुकूल नव्हते. जे झाले त्याबद्दल मी सरकारची माफी मागते''.
नेमके काय घडले?
प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गिलाड एर्डेन यांची लंडनमध्ये तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी युवल रोटेम यांची न्यू यॉर्कमध्ये भेट घेतली अशी माहिती समोर आली. इस्रायलच्या बैठकांमध्ये कोणतेही ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेते, अधिकाऱ्यांशी झालेल्या 12 हून अधिक बैठकांबाबत पटेल यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याबद्दल त्यांना आता आपले पद गमवावे लागणार असे मत इंग्लंडमध्ये विविध माध्यमे व्यक्त करण्यात आले होते. पटेल यांच्या निमित्ताने इंग्लंडमधील विरोधी पक्षांना थेरेसा मे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली. पटेल यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आहे. त्यांनी इस्रायली नेत्यांच्या बैठका घेऊन इस्रायलला गोलन हाईटसमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी बोलणी केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला.
कोण आहेत प्रीती पटेल?
प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले.