बीजिंग - एका गर्भवती महिलेच्या सूपमध्ये उंदीर आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रेस्टॉरंटला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. चीनमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील हा किळसवाणा प्रकार आहे. कहर म्हणजे याहूनही मोठा गंभीर प्रकार रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं केला आहे. उंदीर असलेले सूप प्यायल्यानं दाम्पत्याला गर्भातील बाळावर वाईट परिणाम होण्याची भीती वाटू लागली, यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं गर्भपात करण्यासाठी रोखरक्कम देण्याची ऑफर केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. साऊथ चायना मॉर्निग पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला आणि तिचा पती 6 सप्टेंबरला प्रसिद्ध जियाबु जियाबु रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना सूपमध्ये मेलेला उंदीर आढळून आला.
गर्भाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील, अशी भीती या दाम्पत्यानं व्यक्त केली आणि याबाबतची माहिती रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली तेव्हा त्यानं या दाम्पत्याला अजबच सल्ला दिला. महिलेच्या पतीनं सांगितले की, ''गर्भाच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता वाटत असेल तर आम्ही तुम्हाला गर्भपात करण्यास तीन हजार डॉलर देऊ शकते, असा अजब आणि संतापजनक सल्ला कर्मचाऱ्यानं दिला''.
दरम्यान, यानंतर नुकसान भरपाई म्हणून रेस्टॉरंटकडून दाम्पत्याला 728 डॉलर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, आरोग्य अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटची तपासणी केली असता त्यांना सूपमध्ये उंदीर असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाही. मात्र, अन्य नियमांचं उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानं रेस्टॉरंटला टाळं ठोकण्यात आले आहे.