राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रान्स जनतेला हवेत बराक ओबामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 02:42 PM2017-02-27T14:42:29+5:302017-02-27T14:42:29+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे.
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 27 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत वाशिंगटनमध्ये राहत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे फ्रान्समधील जनतेला ते राष्ट्रपती हवे आहेत.
सध्या फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्ष पदासाठी निवडणूका सुरु आहेत. त्याचबरोबर देशात राष्ट्रपती निवडीबाबत चाललेल्या गोंधळामुळे लोकांचा निवडणुकीमधील रस कमी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक अकल्पित व असंभाव्य युक्ती शोधून काढण्यात आली आहे. ओबामा२०१७ संकेतस्थळाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी याचिका तयार केली आहे. तसेच जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दरम्यान या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 15 मार्चपर्यंत 27000 लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ओबामा यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा त्याग केला. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओबामा यांनी दोन वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा भार सांभाळला असून त्यांना फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षपदी का नेमू नये? देशात पुरोगामी बदल करण्यास तयार असून तसाच एक पुरोगामी प्रस्ताव आम्ही त्यांना देत आहोत, असे या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.
संकेतस्थळाच्या निर्मात्यापैकी एकाने एनपीआरशी बोलताना सांगितले की, नावडत्या उमेदवाराविरोधात मत देण्याऐवजी, आवडत्या उमेदवारासाठी मत देणे नक्कीच सकारात्मक असेल. ओबामा यांच्या नावाचा विचर त्यातूनच आला आहे. या विचाराची निर्थकता आम्हाला माहीत आहे. ओबामा हे फ्रान्सचे नागरिक नसून त्यांना फ्रेंच भाषा देखील बोलता येत नाही. या प्रयत्न निव्वळ गमंत असून यामागे जनतेला फ्रान्सच्या राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी जागरूक करणे हे आहे.