रशियातील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:59 AM2020-04-30T03:59:17+5:302020-04-30T06:51:22+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रीय स्तरावरील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ केली आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मॉस्को : कोरोना साथ निवळण्याचे नाव घेत नसल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रीय स्तरावरील भरपगारी रजेच्या मुदतीत ११ मेपर्यंत वाढ केली आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात मंगळवारी पुतीन यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, रशिया कोरोना विषाणूविरोधातील लढ्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या साथीच्या फैलावाने आता शिखर गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आरोग्याला असलेला प्रचंड धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जाहीर केलेल्या भरपगारी रजेच्या कालावधीत ११मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कोरोना साथीला आळा घालण्यासाठी रशियात लागू केलेला लॉकडाऊन १२ मेपासून टप्प्याटप्प्याने मागे घेण्यासाठी एक कृती आराखडा ५मेपर्यंत तयार करा, कोरोनामुळे देशाचे झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी पावले उचलावीत असे आदेश पुतीन यांनी सरकारला दिले आहेत.
या साथीमुळे रशियात ३० मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा जाहीर करण्यात आली होती तसेच सर्व उद्योगधंद्यांचे काम स्थगित करण्यात आले. कोरोनाच्या फैलावाबाबत पुतीन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती.
>कोरोना रुग्णांची
संख्या ९३ हजारांवर
रशियामध्ये कोरानाची अजिबात लागण न झालेले विभाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र दक्षतेचा उपाय म्हणून तिथेही काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत.
या देशात कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली आहे. मॉस्कोमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी एक नवीन रुग्णालय तातडीने बांधण्यात आले. त्यात सध्या २० रुग्णांना ठेवण्यात
आले आहे.