पंतप्रधानांच्या प्रभावी नियोजनाने कोरोनाला रोखले, निवडणुकीत जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केले
By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 05:37 PM2020-10-17T17:37:09+5:302020-10-17T17:41:44+5:30
Jacinda Ardern News : न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये निडणुकीत एवढे प्रचंड यश कुठलीही व्यक्ती आणि पक्षाला पहिल्यांदाच मिळाले आहे. त्याबरोबरच जसिंडा आर्डर्न पुन्हा एकदा न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
वेलिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना न्यूझीलंडने कोरोनाविरोधात प्रभावी नियोजन करत या जीवघेण्या विषाणूला प्रतिबंध करण्यात यश मिळवले होते. कोरोनाविरोधातील प्रभावी नियोजनासाठी न्यूझीलंडच्यापंतप्रधान जसिंडा आर्डन यांचे कौतुक झाले होते. आता न्यूझीलंडमध्ये झालेल्या निवडणुकीत जसिंडा आर्डर्न यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे.
न्यूझीलंडमध्ये १९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये निडणुकीत एवढे प्रचंड यश कुठलीही व्यक्ती आणि पक्षाला पहिल्यांदाच मिळाले आहे. त्याबरोबरच जसिंडा आर्डर्न पुन्हा एकदा न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
जसिंडा आर्डर्न यांच्या सेंटर-लेफ्ट पक्षाला एकूण ८७ टक्के मतदानापैकी ४८.९ टक्के मते मिळाली. देशाने लेबर पक्षाला ५० वर्षांतील सर्वाधिक पाठिंबा मिळाला आहे, असे जसिंडा यांनी सांगितले. मात्र देशासमोर अजून कठीण काळ येणार आहे. अशावेळी पक्ष प्रत्येक देशवासीयासाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यूझीलंडमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली. २००२ नंतर निवडणुकीतील या पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
जसिंडा आर्डर्न या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विविध कारणांमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अन्य देशांमधील नेत्यांना त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला विरोधी नेत्यांकडून देण्यात येत असतो. जसिंडा यांच्या कार्यकाळात न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ल्यापासून नैसर्गिक आपत्तीपर्यंत अनेक संकटे आली. तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. मात्र या सर्वाचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल त्यांचे कौतुक झाले. जेव्हा जगभरातील मोठमोठे देश कोरोनासमोर गुडघे टेकत होते तेव्हा जसिंडा यांनी न्यूझीलंडमध्ये अचून नियोजन करून कोरोनाला रोखून दाखवले होते. आज मिळालेल्या यशामध्ये कोरोनाकाळातील त्यांच्यी कामगिरीचे मोठे योगदान असल्याचेही सांगण्यात येत आहे.