पी तां, दि. ६ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या म्यानमार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि म्यानमारमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला आहे. तसेच मोदींनी रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्नही अप्रत्यक्षपणे उपस्थित केला. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी भारत त्यांना सर्वप्रकारे मदत करेल, असे आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.म्यानमारमधील पी तां येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मोदींनी सांगितले की म्यानमारमधील शांतता प्रक्रिया कौतुकास्पद आहे. म्यानमार ज्या आव्हानांचा सामना करत आहे, त्याची भारताला पुरेपूर जाणीव आहे. यावेळी मोदींनी म्यानमारच्या नेत्या आंग सान सू ची यांचीही भेट घेतली. म्यानमारमध्ये मोदी म्हणाले, "रखाइन स्टेटमध्ये कट्टरपंथी हिंसेमुळे विशेषकरून सुरक्षा दले आणि निष्पाप नागरिकांच्या जात असलेल्या जिवांबाबत भारत म्यानमारच्या चिंतेत सहभागी आहे. मोठी शांतता प्रक्रिया असो वा कोणत्याही विशेष प्रश्नाची सोडवणूक करण्याचा मुद्दा असो, याबाबत तोडगा काढण्यासाठी आपण काम करू शकतो. अशी मी आशा बाळगतो. ज्यामुळे म्यानमारची एकता आणि भौगोलिक अखंडतेचा मान राखून सर्वांना शांतता, न्याय, सन्मान आणि लोकशाही मूल्ये सुनिश्चित करता येतील. यावेळी मोदींनी म्यानमारच्या नागरिकांसाठी नि:शुल्क व्हिसा उपलब्ध करवून देण्याची घोषणा केली. तर आंग सान सू ची यांनी दहशतवादाला आपल्या आणि आपल्या शेजाऱ्यांच्या भूमीवर पाळेमुळे पसरवण्याची संधी मिळू नये हे आपण एकत्रितपणे सुनिश्चित करू शकतो. सध्या भारतात ४० हजार रोहिंग्या विस्थापित राहत असून, भारताने त्यांची पुन्हा म्यानमारमध्ये रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते. बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचाक तात्काळ थांबवा अशी मागणी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणिस अँटोनियो ग्युटर्स यांनी केली आहे. म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या वांशिक तणाव व दंगली, जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १ लाख २५ हजार लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे. याबरोबरच या वांशिक तणावाचे पडसाद युनायटेड किंग्डमच्या हाऊस आँफ काँमन्समध्येही उमटले. मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना म्यानमारमधील वंशच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का असा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु असल्याचे सांगत अजूनही आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का असाही प्रश्न त्यांनी हाऊस आँफ काँमन्समध्ये केला.
म्यानमार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 5:24 PM