नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. मोदींनी ट्रम्प यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं नातं हे अधिक मजबुतीने पुढे जात असल्याच्या भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाने या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नववर्षाच्या निमित्ताने फोनवरून संवाद साधला. ट्रम्प यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे कुटूंब आणि अमेरिकेच्या लोकांना नव्या वर्षात चांगले आरोग्य, समृद्धी आणि यशासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं नातं हे अधिक मजबुतीने पुढे जात असल्याचे देखील मोदींनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील रणनीती सहकार्य अधिक व्यापक व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांवर या फोनवरील चर्चेदरम्यान प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम सुरू ठेवण्याची इच्छा देखील व्यक्त केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या वर्षात समृद्धी आणि प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या काही वर्षात परस्पर संबंधांवर समाधान व्यक्त केलं आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण तत्पर असल्याचं देखील सांगितलं आहे.
अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये काही महिन्यांपूर्वी हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला होता. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. कार्यक्रमस्थळी जवळपास 50 हजारांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा केली होती. तसेच जेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याचे मोदींनी स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदींचे कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळात 30 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे मोदींनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे. भारत आणि अमेरिकेच्या संविधानातही बरंच साम्य असल्याचं ते म्हणाले. मोदी व्हाईट हाऊसचे अतिशय विश्वासू मित्र आहेत. मोदींना ट्रम्पपेक्षा चांगला मित्र मिळणार नसल्याचे देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत एक मजबूत देश म्हणून वाटचाल करत असल्याचे कौतुकोद्गार ट्रम्प यांनी काढले होते. मोदींमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले असल्याचं ते म्हणाले होते. उज्ज्वल भविष्य हे दोन्ही देशांचं स्वप्न आहे. दोन्ही देश इस्लामिक कट्टरतावादाचा मिळून सामना करतील, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी
अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!
JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी
JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'
फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती