लंडन - ब्रिटनचे प्रिन्स हॅरी (३५) व त्यांची पत्नी मेगन मर्केल (३८) यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर सही केली असून, त्याअंतर्गत आता ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या उपाधीही सोडल्या आहेत. याचबरोबर त्यांना त्यांच्या कर्तव्यपालनासाठी आता सार्वजनिक निधीचा वापरही करता येणार नाही. या कराराचा आणखी असाही एक अर्थ आहे की, हे दाम्पत्य आता ब्रिटनच्या महाराणीचे अधिकृतरीत्या प्रतिनिधित्व करीत नाही.बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे की, ड्यूक आणि डचेज आॅफ ससेक्स हे राजघराण्याचा भाग नसल्यामुळे त्यांना आता एचआरएच उपाधींचा वापर करता येणार नाही. मात्र, राजघराण्याची मूल्ये ते कायम ठेवणार आहेत. तसेच हे दाम्पत्य खाजगी संघटनांशी जोडलेले राहणार आहेत.९३ वर्षीय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी निवेदनात म्हटले आहे की, हॅरी, मेगन व त्यांचा मुलगा आर्ची हे आमच्या कुटुंबातील प्रिय सदस्य राहिलेले आहेत.त्यांच्याशी मागील अनेक महिने चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माझा नातू व त्याचे कुटुंब वेगळे पाऊल टाकत असून, हे रचनात्मक व सहयोगात्मक पद्धतीने सुरू आहे. असे असले तरी या दाम्पत्यासमोर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करीत त्यांच्या स्वतंत्र जीवन जगण्याच्या इच्छेला पाठिंबा दर्शवते.महाराणींनी म्हटले आहे की, मला विशेषत: मेगनचा अभिमान वाटतो. ती खूपच लवकर आमच्या कुटुंबामध्ये मिसळली होती. या करारामुळे दाम्पत्याला पुढील जीवन आनंदात व शांततापूर्ण पद्धतीने जगण्याची संधी मिळाली आहे. त्यांना माझ्या कुटुंबाच्या शुभेच्छा आहेत.विंडसर कॅसलस्थित फ्रोगमोर कॉटेडच्या दुरुस्तीवर खर्च झालेले २४ लाख पाऊंड हे दाम्पत्य परत करणार आहेत. हे त्यांचे कौटुंबिक घर असेल. ते ब्रिटन व कॅनडामध्ये वास्तव्य करतील. मात्र, त्यांची सुरक्षा व्यवस्था व भविष्यातील खर्च कोण करणार, याबाबत टिप्पणी करण्यास पॅलेसच्या सूत्रांनी नकार दिला आहे.ब्रिटनमध्ये चर्चा हार्ड मेक्झिटचीहॅरी व मेगन यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. विशेष म्हणजे या दोघांनी महाराणीशी सल्लामसलत केल्याशिवायच हा निर्णय घेतला होता. संपूर्ण ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटची (ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याची) चर्चा सुरू असताना या घटनेला काही जण हार्ड मेक्झिट असेही संबोधत आहेत.
प्रिन्स हॅरी, मेगन यांनी केला राजघराण्यापासून वेगळे होण्याचा करार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:15 AM