कबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, सरकारकडे प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:45 AM2019-07-18T11:45:33+5:302019-07-18T11:45:54+5:30
कब्रस्थानमध्ये जागा आणि मृतदेहांना दफन करण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो.
लाहोर : पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या कबरींवर एक हजार ते पंधराशे रुपयांचा कर आकारण्याचा प्रस्ताव येथील पंजाब प्रांतातील सरकारला देण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील ‘जंग’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोर नगरपालिकाने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नवीन कबरींवर कर लावण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. कबरींवर आकारण्यात आलेल्या करातून कब्रस्थानांची देखभाल करण्यात येईल. त्यामुळे कब्रस्थानांची व्यवस्था अधिक चांगली होईल, असे लाहोर नगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कब्रस्थानमध्ये जागा आणि मृतदेहांना दफन करण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे लाहोर नगरपालिकेकडून हा कर लावण्यात आल्यानंतर येथील नागरिकांवर त्याचा मोठा भार पडेल, असेही सांगण्यात येत आहे.