इस्लामाबादः पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्ताननं पुलवामा हल्ल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानं म्हणाला, भारतानं ज्या 22 ठिकाणांबद्दल सांगितलं होतं, तिथे कोणतेही दहशतवादी कॅम्प नाहीत. जर भारतानं मागणी केली, तर त्यांना त्या ठिकाणांचा दौरा करण्याची परवानगी देऊ.पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून 54 जणांची चौकशी सुरू आहे. परंतु अद्याप कोणतेही धागेदोरे पाकिस्तानच्या हाती लागलेले नाहीत. आम्हाला जीसुद्धा माहिती मिळेल ती आम्ही नियमानुसार भारताला देऊ, भारताकडून सोपवण्यात आलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानशी या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट होतंय. भारतानं पुलवामा हल्ल्यासंदर्भात ताजे पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत, असंही पाकिस्ताननं सांगितलं आहे.भारतानं दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 27 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्याच्यासंबंधी डोजियार सुपूर्द केलं आहे. भारतानं पाकिस्तानकडे सोपवलेल्या डोजियारमध्ये हा हल्ला जैश-ए-मोहम्मद केल्याचे भक्कम पुरावे आहेत. पाकमध्ये जैशचे कॅम्प आणि त्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असल्याचाही पुराव्यांमध्ये उल्लेख आहेत.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.