भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 05:44 AM2019-09-24T05:44:11+5:302019-09-24T05:46:34+5:30
ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी
वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. भारत, पाकिस्तान राजी असल्यास मी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करेन, असं ट्रम्प म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी अमेरिकेत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा. दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा, असं ट्रम्प म्हणाले. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे इम्रान खान यांचा जळफळाट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं विशेषत: अमेरिकेनं यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी खान यांची मागणी आहे. मात्र काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्यानं तिसऱ्या देशानं यात लक्ष घालू नये, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली आहे.
US President Donald Trump during bilateral meeting with Pakistan PM Imran Khan in New York: I hope India and Pakistan are able to come together and do something that is really smart and good for both, there is always a solution, I really believe there is a solution. https://t.co/MjwKY8CCZ3
— ANI (@ANI) September 23, 2019
काश्मीर प्रश्न अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्याचा दावा खान यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान केला. त्यावेळी पाकिस्तानच्या एका पत्रकारानं ५० दिवस काश्मीरमधील परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं म्हणत मानवाधिकारांबद्दलचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रम्प यांनी असे पत्रकार तुम्ही कुठून शोधून आणता, असं म्हणत खान यांना टोला लगावला.
खान यांच्या भेटीवेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमातील भाषणाचाही उल्लेख केला. मोदींनी त्या कार्यक्रमात केलेलं विधान अतिशय आक्रमक होतं. पंतप्रधान मोदी तसं विधान करतील, असं मला वाटलंही नव्हतं. पण तिथे उपस्थित असलेल्या ५९ हजार लोकांनी त्यांच्या विधानाचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला, असं ट्रम्प म्हणाले.