मुंबईकरांना दिलासा; तलाव क्षेत्रात पावसाने खाते उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:10 AM2019-06-29T06:10:12+5:302019-06-29T06:10:32+5:30
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. संकटकाळासाठी राखून ठेवलेल्या जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यास महापालिका प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. अशा चिंताजनक स्थितीत पावसाने शुक्रवारी सुखद दिलासा दिला. गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांमध्ये एकूण ७१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र तलावांमध्ये सतत जलसाठा कमी होत असल्याने पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले होते. गुरुवारी संध्याकाळी पावसाची संततधार सुरू राहिली. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रांतही शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत असलेल्या विहार आणि तुलसी तलावांत जोरदार पाऊस पडला. तर, मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रांमध्येही पाऊस बरसत होता.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांत १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा अपेक्षित आहे. मात्र गेल्या वर्षी नऊ टक्के कमी साठा तलावांमध्ये जमा झाला. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू आहे. मात्र मान्सून तब्बल तीन आठवडे लांबल्याने तलावांतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली. शासनाच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांतून राखीव साठा मुंबईला देण्याची मागणी मान्य झाल्यामुळे मुंबईकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.