‘धार्मिक’ हिंसेने मानवाधिकार अडचणीत
By admin | Published: June 26, 2015 11:41 PM2015-06-26T23:41:44+5:302015-06-26T23:41:44+5:30
धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे,
वॉशिंग्टन : धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
विविध देशांतील मानवी हक्कांच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या २०१४ या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. भारतातील मानवी हक्कांच्या संदर्भात अनेक मुद्दे आहेत. जबरदस्तीने अटक, तुरुंगात टाकणे, बेपत्ता होणे, तुरुंगातील वाईट स्थिती व खटला चालू होण्याआधी अटक करणे यासारखे अनेक प्रकार होतात. शिवाय न्यायालयांची दिरंगाई, निर्धारित वेळेत न्याय न मिळणे याही बाबी सर्रास होताना दिसतात.
मानवी हक्कांचे उल्लंघन पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून सर्रास केले जाते. आरोपींना ठार मारणे, त्यांचा छळ करणे बलात्कार करणे हे गुन्हे सर्रास होताना दिसतात. अत्याचार होणाऱ्या महिला अनुसूचित जाती वा जमातीच्या असतात, असे या अहवालात म्हटले आहे.
जातीयवादी हिंसाचारात १,२०० लोक मरण पावले असून, त्यात मुस्लिम जास्त आहेत. २०१४ च्या निवडणुकीत फेसबुकवर राजकीय कॉमेंट टाकणाऱ्या लोकांना अटक करण्यात आली, असे जॉन केरी यांनी या अहवालावर लिहिलेल्या प्रस्तावनपर लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)