डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रातल्या काढल्या चुका; निवृत्त शिक्षिकेनं परत पाठवले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 04:57 PM2018-05-28T16:57:55+5:302018-05-28T16:59:41+5:30
व्हाईट हाऊसमधून आलेल्या पत्रातील चुका दिसल्यावर मॅसनबाईंनी सरळ पेन काढून चुका रंगवल्या, तेथे शेरे मारले आणि त्याचा फोटो काढून फेसबूकवरही टाकले.
न्यू यॉर्क- इंग्लिश शब्द, त्यांचे स्पेलिंग, इंग्लिश बोलणं हे सगळं तुम्हाला अवघड वाटत असेल ना. जगातील अनेक देशांमध्ये इंग्लिश पोहोचली असली तरी ती परिपूर्णरित्या बोलता, लिहिता येणं सर्वच देशांमध्ये शक्य झालेलं नाही. पण हे सगळं इतर देशांपूरतं ठिक आहे. पण खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रातील जवळजवळ प्रत्येक ओळीत चुका सापडल्या तर ? हो असंच झालंय. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून पाठवलेल्या पत्रातील चुका शोधून एका निवृत्त शिक्षिकेने हेच पत्र रंगवून पुन्हा व्हाईट हाऊसकडे पाठवले आहे.
य्वोने मॅसन असं या निवृत्त शिक्षिकेचं नाव असून ते इंग्रजीचेच शिक्षक होते. ते 2017 साली निवृत्त झाले असले तरी आपण अजून शिक्षकांच्या भूमिकेतून बाहेर पडलेलो नसल्याचं त्यांनी या पत्राच्या निमित्तानं दाखवून दिलं आहे. व्हाईट हाऊसमधून त्यांना 3 मे रोजी पत्र पाठवण्यात आलं. या पत्रात त्यांना भरपूर चुका दिसल्या. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी खूण करुन त्यांनी पेपर तपासताना शेरे मारतात तसे शेरेही मारले आहेत. तुम्ही ग्रामर स्टाईल चेक वापरलं आहे का? फेडरल शब्दातील एफ फक्त ते विशेष नाम म्हणून वापरायचे असेल तेव्हाच कॅपिटल असतं. असे अनेक शेरे त्यांनी लिहिले आहेत. तसेच पत्राच्या शेवटी तर ओह माय गॉड धिस इज राँग असाही शेरा त्यांनी मारला आहे.
व्हाईट हाऊसमधून आलेल्या पत्रातील चुका दिसल्यावर मॅसनबाईंनी सरळ पेन काढून चुका रंगवल्या, तेथे शेरे मारले आणि त्याचा फोटो काढून फेसबूकवरही टाकले व नंतर थेट व्हाईट हाऊसलाच ते पत्र पाठवून दिले. या पत्रातील भाषा अत्यंत वाईट होती असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पार्कलँड फ्लोरिडा येथे शाळेत गोळीबार झाल्यावर 17 लोकांचे प्राण गेले होते. त्यातील मृतांच्या नातेवाईकांना भेटा असे सांगणारे पत्र मॅसन यांनी ट्रम्प यांना पाठवले होते. मात्र पत्रामध्ये आपण सांगितलेल्या मुद्द्यांवर काहीच उत्तर मिळाले नाही असे मॅसन यांनी सांगितले आहे.