इस्लामाबाद : जनतेला स्वतंत्र व्हायचे की पाकिस्तानातच राहायचे याच्या निर्णयासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही सार्वमत घेण्यास तयार आहोत अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारतातील काश्मीरच्या जनतेचे मतही जाणून घ्या, असेही ते म्हणाले.
एका परदेशी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, स्वत:चे भवितव्य काय असावे, याचा निर्णय जनतेने सार्वमताद्वारे घेणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पाकव्याप्त काश्मीर व भारतीय काश्मीरमधील जनतेचा तो हक्क आहे. इम्रान खान यांनी सांगितले की, पाकव्याप्त काश्मीरमधील मानवी हक्क जपणुकीची स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी जगभरातील कोणीही तिथे जावे. पाकव्याप्त काश्मीर व भारतातील काश्मीर येथील मानवी हक्कांबाबतची स्थिती या लोकांनी अभ्यासावी. या दोन्ही भागांत नेमका काय फरक आहे हे त्यांना दिसून येईल.
भारताकडील काश्मीरमध्ये अशी पाहणी करण्याची परवानगी निरीक्षकांना मिळणार नाही. ते म्हणाले की, भारताबरोबर संवाद साधण्याचे पाकिस्तानने हरप्रकारे प्रयत्न केले. मात्र, रा. स्व. संघाच्या विचारसरणीचा पगडा असलेल्या मोदी सरकारने पाकिस्तानला काहीही प्रतिसाद दिला नाही. भारतामध्ये नेमके काय घडत आहे, याची पूर्वकल्पना मीच जगाला दिली अशी दर्पोक्तीही इम्रान खान यांनी केली. (वृत्तसंस्था)ट्रम्प यांनी मध्यस्थी करावीप्रश्न योग्य पद्धतीने सोडविल्याशिवाय पाकिस्तानचे भारताशी शांततापूर्ण संबंध निर्माण होणे कठीण आहे. अशा संबंधांसाठी पाकिस्तान वाट्टेल ती किंमत मोजणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले. अमेरिकेतील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, काश्मीरप्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, अशी पाकची मागणी आहे. काश्मीर प्रश्नावर भारताविरोधात पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.गरिबी, कुपोषण आदी समस्यांविरोधात लढण्याऐवजी रा. स्व. संघाचा पाठिंबा असलेले मोदी सरकार भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहे, असा आरोपही शाह महमूद कुरेशी यांनी केला.