ऋषी सुनक इतिहासाच्या उंबरठ्यावर! अधिकृत दावेदारीची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 09:25 AM2022-10-24T09:25:45+5:302022-10-24T09:26:06+5:30
बोरिस जॉन्सन यांनी अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. पाठिंब्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेनी मॉडॉन्ट यांच्यामुळे ही निवडणूक तिहेरी होऊ शकते.
लंडन : भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी रविवारी ब्रिटिश पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची जागा घेण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हुजूर पक्षाच्या नेतृत्वाची निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक आता स्पष्टपणे आघाडीवर आहेत. त्यांना संसदेच्या किमान १२८ खासदारांचा पाठिंबा आहे. असे असले तरी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंतांनी त्यांच्याकडे संसदेत येण्यासाठी आवश्यक १०० खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
बोरिस जॉन्सन यांनी अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. पाठिंब्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेनी मॉडॉन्ट यांच्यामुळे ही निवडणूक तिहेरी होऊ शकते. माझ्याकडे सर्वात मोठ्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक स्पष्ट योजना आहे. मी २०१९च्या जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करील, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन सनक यांनी देशवासीयांना केले आहे.
पंतप्रधानांची निवड कशी होणार?
१. ब्रिटनच्या नियमांनुसार संसदेतील हुजूर पक्षाच्या ३५० हून अधिक खासदारांपैकी केवळ एका उमेदवाराला किमान १०० खासदारांचा पाठिबा मिळाला तर त्यास सोमवारी पंतप्रधान म्हणून जाहीर केले जाईल.
२. जर दोन उमेदवारांनी समर्थनाची ती पातळी गाठली तर ते त्यांना पक्षातील सदस्यांच्या मतदानाला सामोरे जावे लागेल. त्यांच्या मतदानात जो होईल, त्यास येत्या शुक्रवारी पंतप्रधान म्हणून घोषित केले जाईल.
निवडणुकीची मागणी
सत्ताधारी पक्षातील नेतृत्वाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक निवडणूक घेण्याची मागणी विरोधी मजूर पक्षाने केली आहे. 'आम्हाला स्थिर सरकार देण्याची संधी दिली गेली पाहिजे. सत्ताधारी पक्षात अनागोंदी चालू आहे. त्यांचे देशाला नव्हे, पक्षाला प्रथम प्राधान्य आहे आणि हे चुकीचे आहे, अशी टीका मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी केली.
ऋषी सुनक यांचा इतिहास
>> ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यास ते ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील. त्यांचे कुटुब १९६० च्या दशकात ब्रिटनमध्ये गेले.
>> सुनक हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत.
>> इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तीची मुलगी अक्षता मूर्तीशी त्यांचे लग्न झाले आहे.
देशासाठी काम करायचे आहे
ब्रिटन हा एक महान देश आहे; परंतु आम्ही गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत आहोत. म्हणूनच मी हुजूर पक्षाचा नेता आणि पुढचा पंतप्रधान होण्यासाठी उभा आहे. मला आमची अर्थव्यवस्था सुधारायची आहे, आमच्या पक्षाला एकत्र आणायचे आहे. देशासाठी काम करायचे आहे.
- ऋषी सुनक