ठळक मुद्दे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा गायले काश्मीरचे रडगाणे भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून केले वॉकआऊट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार
संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचे रडगाणे गायले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. तसेच गांधी-नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडचिठ्ठी देऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसएसकडून सुरू आहे, दावा इम्रान खानने केला. दरम्यान, इम्रानने भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केल्यावर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून वॉकआऊट केले.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या धोक्यामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने होत आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणास उभे राहिल्यापासून इम्रान खान यांनी भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न उपस्थित केला. सोबतच भारतातील राजकीय परिस्थितीतवरीही आक्षेपार्ह विधान केले. सध्या भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडून दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला.इम्रान खान यांनी केलेल्या या भाषणावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले की. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य हे कुटनीतिक दृष्टीने खालच्या पातळीवरील होते. इम्रान खान यांच्या भाषणामध्ये खोटारडेपणा, वैयक्तिक आरोप आणि आपल्याकडील अल्पसंख्याकांची परिस्थिती न पाहता भारतावर टीका करण्याचा समावेश होता. याचं उत्तर राइट टू रिप्लायच्या माध्यमातून दिलं जाईल.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार आज २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संबोधनातील पहिले वक्ते असतील. स्थानिक वेळेनुसार सकाली ९ वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता मोदींच्या संबोधनास सुरुवात होईल.