युद्ध आणखी सुरूच... राखरांगाेळी करून रशियाने घेतला मारियुपाेलचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:26 AM2022-05-22T08:26:55+5:302022-05-22T08:27:39+5:30
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शाेईगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मारियुपाेलचा ताबा घेतल्याची माहिती दिली
मास्काे : रशियाने मारियुपाेल हे युक्रेनचे महत्त्वाचे शहर पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. सुमारे तीन महिन्यांपासून युक्रेनसाेबत सुरू असलेल्या युद्धात रशियाचा सर्वात माेठा विजय मानला जात आहे. मात्र, या युद्धात मारियुपाेलमधील सुमारे २० हजार नागरिक ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून या शहराची राखरांगाेळी झाली आहे.
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शाेईगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मारियुपाेलचा ताबा घेतल्याची माहिती दिली. यासंदर्भात युक्रेनकडून अद्याप काेणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मारियुपाेलमधील सर्वात माेठ्या पाेलाद कारखान्यातून रशियाला माेठा प्रतिकार झाला.
युक्रेनी सैनिकांबद्दल जगभरातून चिंता
युक्रेनच्या अझाेव्ह रेजिमेंटने या प्रतिकाराचे नेतृत्व केले हाेते. रेजिमेंटच्या कमांडरला रशियन सैन्याने एका बंद वाहनातून अज्ञात स्थळी नेले आहे. या सैनिकांवर रशियाने नाझींचा ठप्पा लावल्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.