मॉस्को - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. युद्धपातळीवर संशोधन सुरू असताना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीबाबत (Oxford coronavirus vaccine) अजब दावा करण्यात येत आहे. अॅस्ट्राजेनका ही लस घेतल्यास माणूस माकड होणार असल्याचा प्रचार करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर याबाबतचा मेसेज जोरदार व्हायरल होत असून रशियात हा अजब दावा करणारा प्रचार सुरू आहे. तसेच दावा करताना काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात येत आहेत. ही लस तयार करण्यासाठी चिंपाझीच्या व्हायरसचा वापर करण्यात येत असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे. एका रशियन टीव्ही कार्यक्रमातही अशा प्रकारचे वृत्त प्रसारीत करण्यात आले. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा एक मॉर्फ केलेला फोटो देखील आहे. यामध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयाबाहेर यतीच्या रुपात फिरताना दाखवण्यात आले आहे.
अजब दावा करणारे फोटो व्हायरल
कोरोना लसीबाबत अजब दावा करणाऱ्या आणखी एका व्हायरल झालेल्या फोटोत लस विकसित करत असलेल्या अॅस्ट्राजेनकाच्या लॅबमध्ये अॅप्रॉन घातलेला एक चिंपाझी दाखवण्यात आला आहे. तर आणखी एका फोटोत अमेरिकेच्या अंकल सॅमला दाखवण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्या मागे असणाऱ्या बॅनरवर मी तुम्हाला मंकी वॅक्सीन देऊ इच्छित असल्याचं देखील म्हटलं आहे. ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला बदनाम करण्यासाठी हा प्रचार सुरू असल्याची ब्रिटनमध्ये चर्चा सुरू आहे.
लसीची बदनामी करून रशियाला आपल्या Sputnik V लसीची विक्री करायची असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनने तयार केलेली लस निरुपयोगी असून यामुळे माणूस माकड बनेल असा दावा करण्यात येत आहे. अॅस्ट्राजेनकाचे सीईओ पास्कल सोरिएट (Pascal Soriot) यांनी रशियामध्ये होत असलेल्या या अपप्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अॅस्ट्राजेनका जगभरातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन, संशोधन करून लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहे. लस प्रभावी आणि सुरक्षित आहे की नाही याची तपासणी केली जात असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'स्पुटनिक-व्ही'नंतर आता रशियाच्या दुसऱ्या कोरोना लसीलाही मंजुरी
रशियाने 12 ऑगस्टला जगातील पहिली लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली होती. आता दुसरी कोरोनावरील लस एपिवॅक कोरोना (EpiVacCorona) ला मंजुरी देण्यात आली आहे.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी देशातील दुसरी कोरोना लस तयार होण्याची घोषणा केली. रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी जाहीर केले की, देशात दुसर्या कोरोनावरीललस 'EpiVacCorona' मंजूर झाली आहे. सुरुवातीच्या चाचणीमध्ये चांगले परिणाम दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेप्टाइड-आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे.