ओदेसात रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १९ ठार; एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे - युक्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:32 AM2022-07-02T10:32:50+5:302022-07-02T10:34:11+5:30
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रे यरमाक यांनी सांगितले की, एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे.
कीव्ह : युक्रेनच्या बंदराचे शहर असलेल्या ओदेसानजीकच्या किनारपट्टीलगतच्या शहरातील निवासी परिसरात रशियाने पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १९ लोक ठार झाले आहेत. रशियन फौजांनी ब्लॅक सीमधील बेटातून माघार घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी रशियाने हा हल्ला केला.
हल्ल्याच्या व्हिडिओत ओदेसाच्या नैर्ऋत्येला ५० किलोमीटर दूर असलेल्या सेरहिव्का शहरात इमारतींचा ढिगारा दिसतो. युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने सांगितले की, रशियाच्या बॉम्बफेक विमानातून डागलेले तीन एक्स-२२ क्षेपणास्त्र एक इमारत आणि २ शिबिरांवर कोसळले.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रे यरमाक यांनी सांगितले की, एक दहशतवादी देश आमच्या नागरिकांची हत्या करीत आहे. युद्धग्रस्त क्षेत्रातील पराभवाचा सूड घेण्यासाठी हा देश नागरिकांशी लढत आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवा विभागाने सांगितले की, या हल्ल्यात दोन बालकांसमवेत १९ लोकांचा मृत्यू झाला. सहा बालके आणि एका गर्भवती महिलेसह ३८ लोकांंना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे लोक निवासी इमारतीत राहणारे आहेत. हल्ल्याच्या आदल्या दिवशी रशियन फौजांनी स्नेक बेटातून माघार घेतली होती. त्यामुळे ओदेसावरील धोका कमी झाला.
मोदी यांची पुतिन यांच्याशी चर्चा
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फोनवरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. युक्रेन संकट राजनैतिक मार्गाने आणि चर्चेतून सोडविण्याच्या भारताच्या भूमिकेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.
- पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि अन्नधान्य बाजाराच्या स्थितीसह जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. डिसेंबर २०२१ मधील पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला.
- दोन्ही नेत्यांनी प्रामुख्याने कृषी वस्तू, खते आणि औषधी उत्पादनात द्विपक्षीय व्यापाराला कसे प्रोत्साहन देता येईल, यावर चर्चा केली.
भारतापुढे अमेरिका हतबल
- अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची भूमिका बदलल्याचे दिसते. जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या आठवड्यात निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी म्हटले होते की, भारताला कोणाचीही बाजू घेण्याची गरज नाही.
- पाश्चात्त्य देशांच्या या भूमिकेवरून भारताने आपल्या भू-राजकीय स्थितीचा कशा प्रकारे फायदा घेतला. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याने भारताचे समर्थन केले.