Video: चमत्कार...समुद्रात बुडालेला तिचा आयफोन वाचवण्यासाठी 'देवा'चा मत्स्यावतार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:22 PM2019-05-11T14:22:17+5:302019-05-11T14:40:15+5:30
रशियन नौदलाने प्रशिक्षित केलेला बेल्युगा माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय.
मुंबई - रशियन नौदलाने प्रशिक्षित केलेला बेल्युगा माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. एका महिलेचा फोन तिला परत केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. ऐनवेळी मदतीला धावून आल्याने या बेल्युगा व्हेल(देव मासा) माशाचं कौतुकही नेटीझन्सकडून केलं जातंय.
इना मानसिका ही महिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हॅमरफेस्ट हार्बर या ठिकाणी समुद्रामध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी अपघाताने तिचा आयफोन हा समुद्रात पडला. समुद्रात पडलेला आयफोन आता परत मिळणार नाही याच निराशेत असताना अचानक समुद्राच्या पाण्यातून एक व्हेल मासावर येताना दिसला. या माशाने चक्क या महिलेचा आयफोन तोंडात धरत वर येताना पाहिल्यानंतर इना आणि तिच्या मित्रमैत्रिणींनाही आश्चर्याचा धक्का बसला.
या बेल्युगा माशाने आयफोन पुन्हा इनाला परत दिला. त्यावेळी तिच्या मित्रांनी ही दृश्य कॅमेरात कैद केली. व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा हा व्हेल मासा समुद्राच्या पाण्यातून वर येताना दिसतो. त्यानंतर बोटीवर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना धक्का बसतो. इना तिचा हात पुढे करते आणि मासा तिचा आयफोन परत करतो.
स्थानिक माध्यमांशी बोलताना इनाने सांगितले की, समुद्रामध्ये आम्ही फिरण्यासाठी गेलो असताना अचानक माझ्या जॅकेटमधील आयफोन पाण्यात पडला. फोन पडल्यानंतर आता परत मिळणार नाही असचं वाटतं होतं. मात्र काही मिनिटांनंतर समुद्राच्या पाण्यातून आमच्या बोटीजवळ एक मासा येताना आम्ही पाहिलं. या माशाच्या तोंडात मोबाईल बघून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. इना मानसिकाने हा व्हिडीओ तिच्या इंन्स्टाग्रामला शेअर केला. या व्हिडीओला जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे