कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन तीन महिने होत आले आहेत. आठवड्याभरात युक्रेन गुडघे टेकेल, असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होता. मात्र युक्रेनी सैन्यानं कडवी लढत देत रशियन सैन्याचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे आता रशियन सैन्यानं युक्रेनला पराभूत करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि मोर्टारचा वापर सुरू केला आहे.
रशियन सैन्यानं अजोवस्टल स्टिल कारखान्यावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रशियन सैनिकांनी स्टिल कारखान्यावर फॉस्फरस बॉम्बनं हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केला आहे. या हल्ल्याचा पुरावा म्हणून युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव यांनी टएक व्हिडीओ ट्विट केला आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.
मारियुपोलच्या संरक्षकांविरोधात फॉस्फरस हल्ल्याचा वापराचा व्हिडीओ पुरावा, असं युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अजोवस्टल एकट्या युक्रेनसाठी नव्हे, तर संपूर्ण युरोपसाठी उभा आहे. कधीही माफ करू नका, कधीही विसरू नका, असं फेडोरोव यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. युक्रेनविरोधात फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप याआधीही रशियावर झाला आहे. पूर्व युक्रेनमधील क्रामाटोरस्क शहरावर रशियानं फॉस्फरस बॉम्बनं हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केला होता.
युक्रेनी सैन्यानं स्टिल कारखान्याजवळ असलेल्या जमिनीखाली सुरुंग पेरले आहेत. युक्रेनचे सैनिक कारखान्याच्या बाहेर येऊन रशियन सैन्यावर हल्ले करतात आणि त्यानंतर कारखान्यात जाऊन लपतात. त्यामुळे रशियन सैन्याचे अनेक हल्ले निकामी ठरले. युक्रेनी सैन्य जमिनीखाली काही फुटांवर लपले असल्यानं रशियन सैन्याचे अनेक हल्ले कुचकामी ठरले. त्यानंतर रशियन फौजेनं रणनीती बदलली आणि फॉस्फरस बॉम्बचा वापर सुरू केला.