मॉस्को: दो गज की जरुरी, मास्क पहनना है जरुरी.. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगभरात नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्कचे नियम न पाळल्यास शिक्षा होऊ शकते. मात्र गेले कित्येक महिन्यांपासून नियमांचं पालन करून आता नागरिकही कंटाळले आहेत. अजून किती महिने नियम पाळायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना कंटाळलेल्या रशियातील तरुणांनी अनोख्या प्रकारे निषेध केला आहे.रशियाच्या Yekaterinburg शहरातील मेट्रोमध्ये तरुण-तरुणींनी चुंबन घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा निषेध केला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, असं नियमांचा निषेध करणाऱ्या काहींनी लाईफ नावाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना सांगितलं. रशियाच्या संगीत विश्वातले बरेचजण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना विरोध करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं तरुण-तरुणींनी म्हटलं.प्रियकर/प्रेयसीचं चुंबन घेऊन निषेध करणाऱ्या तरुण-तरुणींनी सरकारच्या विसंगत धोरणांकडे लक्ष वेधलं. 'कॉन्सर्ट्स, रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा धोका जास्त असल्याचं सरकारला वाटतं. नाईट क्लब्ज आणि इव्हिनिंग शोज बंद ठेवण्यात आले आहेत. पण मेट्रोमध्ये गर्दी आहे. त्या गर्दीतून नागरिक प्रवास करत आहेत. मात्र त्याबद्दल सरकारला काहीच वाटत नाही. मेट्रोतील गर्दीमुळे कोरोना पसरण्याची सर्वाधिक शक्यता आहे,' असं मत अनेकांनी व्यक्त केलं.कोरोना संकटाचा मोठा फटका संगीत क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगितिक कार्यक्रम करण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे जगातील संगीत क्षेत्राचं कंबरडं मोडलं आहे. संगीत विश्वातून अनेक जण कोरोना नियमांचा निषेध करत आहेत. त्याला तरुणाईचाही पाठिंबा मिळत आहे.
कोरोनाच्या नियमांचा वैताग! प्रेमी युगुलांनी मेट्रोत चुंबन करून नोंदवला निषेध
By कुणाल गवाणकर | Published: January 01, 2021 7:18 PM