मॉस्को : जगातील प्रत्येक देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. व्यापार, वाढता तणाव यामुळे या देशांमध्ये स्पर्धा वाढीस लागली आहे. यातून भविष्यात युद्धाची स्थिती उद्भवल्यास अमेरिका स्पेस फोर्स तयार करत असताना रशियानेही रोबोकॉप तयार करत जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हा पोशाख परिधान करणाऱ्या सैनिकाची ताकद सामान्य सैनिकापेक्षा कित्येक पटींनी वाढणार आहे.
रशियाने नुकतेच लष्कराचे प्रदर्शन भरविले होते. लष्करी सुपर सोल्जर स्केलिटन हा रोबोकॉपचा सूट बॉलिवूड मुव्हीमध्ये दाखविल्या जाणाऱ्या रोबोसारखेच आहे. हा सूट घातल्यानंतर पायी चालणारा सैनिक एका हातानेच मशीन गन चालवू शकणार आहे. तसेच त्यांचा निशाना कॉम्पुटरसारखा अचूक असणार आहे.
हा पोशाख घातल्यावर जवान जड सामानही आरामात उचलू शकणार आहेत. तसेच वेगात धावूही शकणार आहेत. बंदुकीच्या गोळ्यांचा कोणताही परिणाम या सूटवर होत नाही. तसेच बॉम्बमधील छोट्या छऱ्यांचेही काहीही परिणाम जाणवणार नाही. रशियासाठी शस्त्रे बनविणाऱ्या कंपनीचा हा दावा आहे की, 2025 पर्यंत युद्धासाठी हा सूट तयार होईल. सध्या या सूटला बॅटरीची काही समस्या येत आहे.
वैशिष्टे :
- बंदुकीची गोळी न घुसण्यासाठी बुलेटप्रुफ नेक प्रोटेक्टर
- डिजिटल हेल्मेट, ज्यावर लक्ष्याबाबत सुचना मिळते. याचबरोबर सोल्जरच्या प्रकृतीची माहीती समजते.
- चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी मास्क, श्वास घेण्यासाठी विशेष कल्पनेचा वापर
- सूटचे तापमान कमी-जास्त करण्याची सोय. वॉटर रेझिस्टंससह आग प्रतिबंधकही
- टॉर्च, बॅटरी पॅक आणि रात्रीसाठी व्हिडिओ कॅमेराही दिला आहे.
- रायफलमध्ये दोन बॅरल जी वेगवेगळ्या आकाराच्या गोळ्या झाडू शकतात.
- भुसुरुंग, चिखल सारख्या संकटांचा कोणताही परिणाम न जाणवण्यासाठी बुटांची रचना.