दुबई, दि. 22 - वारंवार सांगूनही आपल्या पुढे पुढे चालत असल्याने पत्नीला घटस्फोट देण्यात आल्याची धक्कादायक घटना सौदीत घडली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला घटस्फोट दिला आहे. सौदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरुन पती पत्नीमध्ये भांडण होऊन, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचं समोर येत आहे. समुपदेशनासाठी विवाहित दांपत्यांचे येणारे फोन वाढू लागले आहेत. यामध्ये नवविवाहित दांपत्यांची संख्या जास्त आहे.
घटस्फोट देणा-या या पतीची ओळख पटलेली नाही. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने वारंवार आपल्या पत्नीला चालताना मागून चालण्याची तंबी दिली होती. मात्र यानंतरी ती पुढेच चालत होती. शेवटी चिडलेल्या पतीने पत्नीला घटस्फोट देऊन रस्ताच वेगळा केला.
अशीच दुसरी एक घटना सौदीमध्ये घडली आहे, जिथे पत्नीने जेवताना एक पदार्थ न वाढल्याने घटस्फोट देण्यात आला. सौदीमध्ये डिनरदरम्यान 'शीप हेड' अत्यंत महत्वाचा पदार्थ मानला जातो. मात्र पत्नीने जेवताना तो पदार्थ वाढलाच नाही, या रागाने पतीने पत्नीला घटस्फोट देऊन टाकला. पतीने मित्रांसाठी डिनर आयोजित केला होता, त्यावेळी पत्नी हा पदार्थ वाढण्यास विसरली. मात्र हा विसराळूपणा तिला खूपच महाग पडला.
पीडित पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मित्र निघून गेले तेव्हा पतीने मित्रांसमोर मला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागल्याचं सांगत संताप व्यक्त केला. अजून एका घटनेत पत्नीने हनीमूनला पैंजण घातल्याच्या रागातून पतीने घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विवाह लावून देणारे अधिकारी हुमूद अल शिम्मारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांमध्ये घटस्फोटाच्या आकडेवारीत खूप मोठी वाढ झाली आहे. घटस्फोटासाठी वेगवेगळी कारणं असून अनेकदा परंपरा, प्रथा, आधुनिक तंत्रज्ञान यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कारणीभूत ठरतो.
सौदी अरेबियामधील सोशल कन्सल्टंट लतीफा हमीद यांनी सांगितलं आहे की, 'कुटुंबांनी त्यांच्या घरातील तरुणांना सामाजिक, धार्मिक शिकवण देणं गरजेचं आहे. यामुळे कुटुंबात होणारे वाद कमी होतील, आणि नाती तुटण्यापासून वाचतील'.