शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. “हे युग युद्धाचं नाही. मी तुमच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. शांततेच्या मार्गानं पुढे कसं जाता येईल यावर चर्चा करायची आहे. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकत्र आहेत,” असं मोदी यावेळी म्हणाले.
यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीदेखील उत्तर दिलं. “युक्रेन संघर्षावर तुमची स्थिती मी जाणतो. मी तुमची चिंताही समजतो. हे संकट लवकर संपावं अशी आमची इच्छा आहे. परंतु दुसरा पक्ष युक्रेन त्यांना संवाद प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाहीये. आमचं ध्येय आम्हाला युद्धाच्या मैदानातच गाठायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही याबाबत संपूर्ण परिस्थितीची तुम्हाला माहिती देत राहू,” असं पुतीन यांनी स्पष्ट केलं.