बार्सिलोना, दि. 19 - स्पेनमधील बार्सिलोना हे शहर गुरुवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं. दहशतवादी हल्ल्यात 13 जणांना जीव गमवावा लागला असला तरी या हल्ल्यातून बचावलेल्या ज्युलिया मोनॅकोची सोशल मीडियावर चर्चा आहे. ऑस्ट्रेलियामधील 36 वर्षांची ज्युलिया ही बार्सिलोनामध्ये शॉपिंग करत होती. त्याच वेळी अचानकपणे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला, मात्र तरीही दहशतवादी हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यात ज्युलियाला तिस-यांदा यश आलं आहे. या आधीही लंडन आणि पॅरिस व आता झालेल्या स्पेनमधील दहशतवादी हल्ल्यांतून तिनं स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली होती.ज्युलिया मोनॅको गुरुवारी संध्याकाळी बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये शॉपिंग करत होती. ज्युलिया शॉपिंग करण्यात दंग असतानाच पाठीमागून एक भरधाव कार आली अन् त्या कारनं अनेकांना चिरडलं. कारच्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक लोक जखमी असल्याचीही माहिती मिळाली होती. या दहशतवादी हल्ल्यातून ज्युलिया बचावल्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. यापूर्वीसुद्धा ज्युलिया पॅऱिस आणि लंडनमधील दहशतवादी हल्ल्यातून बचावली होती. लंडनमध्ये 3 जून रोजी दहशतवाद्यांनी चाकूनं हल्ला केला होता. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत तिनं स्वतःचा जीव वाचवला होता. त्यानंतर काही दिवसांनी पॅरिसमधील कॅथेड्रल येथे झालेल्या हल्ल्यातही तिनं हुशारीनं स्वतःला वाचवलं होतं. पॅरिसमधील नोथ्रे डेम कॅथेड्रल येथे दहशतवाद्यानं पोलिसांवर हातोड्यानं हल्ला केला होता. तेव्हासुद्धा ज्युलियाही तिथेच होती. आतापर्यंत तीन दहशतवादी हल्ले जवळून पाहिल्यानंतर ज्युलियानं धीर सोडलेला नाही. दहशतवाद्यांचे इरादे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असं ती म्हणाली आहे.स्पेनमधील दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखॉय यांनी 'जिहादी हल्ला' असा करार दिला आहे. तत्पूर्वी युरोपिय देशात अनेकदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झालेत. फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश अशा हल्ल्यांनी हादरले आहेत. स्पेनच्या राजघराण्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. देश अतिरेक्यांच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं विधान स्पेनच्या राजघराण्यानं केलं आहे. स्पेन पोलिसांच्या माहितीनुसार, दुस-या होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला आहे. स्पेनमध्ये झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले असून, एक पोलीस जखमी आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
स्पेनमधल्या बार्सिलोनातील हल्ल्यात 'ती'ने तिस-यांदा मृत्यूला दिली हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 7:20 AM