अजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला. अमेरिकेतील मिशिगनमध्ये असलेल्या एका Pet स्टोअरमधून अजगराची चोरी करण्यात आली आहे. चोराचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'आय लव्ह माय पेट्स स्टोर' या दुकानातून एका 4 फुटाचा अजगर चोरीला गेला आहे. चोराने या दुकानातून आधी 6 डॉलरचा एक उंदीर खरेदी केला. त्यानंतर त्याने अजगराची चोरी करून दुकानातून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती दुकानात काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली आहे. तसेच याबाबत फेसबुकवरही एक पोस्ट अपलोड करण्यात आली आहे.
'आमच्या सर्वात सुंदर Ball Python ला कोणीतरी चोरलं आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाही. 20 मार्च 2019 रोजी एका व्यक्तीने हा सुंदर अजगर दत्तक घेतला होता. मात्र ज्या दिवशी आम्ही त्याला त्याचा घरी सोडणार होतो त्याच दिवशी अजगराची चोरी झाली आहे. जर तुमच्याकडे या अज्ञात व्यक्तीसंदर्भात काही माहिती असेल तर कृपया रॉकवूड पोलिसांकडे संपर्क करा' असं पेट स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. चोराचा स्टोअरमधून अजगर चोरतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
रॉकवूड पोलिसांनी स्टोअरमधील सीसीटीव्ही फुटेज आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केलं आहे. तसेच या अजगराचा शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. जवळपास चार फुटाचा साप चोराने पँटच्या खिशात टाकून चोरल्याची माहिती मिळताच सर्वजण हैराण झाले आहेत. तसेच या चोरीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अजगराची चोरी झाल्याचं समजताच लोकांनी फेसबुक पोस्टमधून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. चोरीला गेलेला अजगर लवकरता लवकर सुखरुप सापडावा अशी आशा अनेक लोक व्यक्त करत आहेत. तस्करीसाठी हा अजगर चोरण्यात आला असल्याची देखील सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.