स्पेन : चुका कोणाच्याही हातून होत असतात. अनेक चुका करत करत माणुस शिकत असतो. अगदी एखादं काम आपण नियमित करत असलो तरीही आपल्या हातून ती गोष्ट चुकू शकते. उदाहरणार्थ - डॉक्टरांनी अनेक रुग्णांना मृतही घोषित केलंय, जे कालांतराने जिवंत असल्याचं समोर आलंय. अशा अक्षम्य चुका प्रत्येकाच्या हातून होत असतात. अशीच एक चूक झालीय स्पेनमधील डॉक्टरांच्या हातून. तिथे तिनही डॉक्टरांनी एकच चूक केली. त्यांनी तिघांनी एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं. पण मृत घोषित केल्याच्या तिसऱ्याच तासाला हा रुग्ण घोरायला लागल्याने डॉक्टरांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
आणखी वाचा - जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेनच्या ओवीडो शहरातील मॉरच्युरी येथे तीन डॉक्टरांनी गोंजालो मोटोया जिमेनेज या रुग्णाला जिवंतपणीच मृत घोषित केलं. या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ‘सकाळी गोंजालोंनी जेव्हा डोळे उघडले नाहीत तेव्हा आम्ही त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे नेलं. त्यानंतर त्यांचं जवळपास तीन डॉक्टरांनी परिक्षण केलं. या परिक्षणात रुग्ण जिवंत असल्याची कोणतीही लक्षण जाणवली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत व्यक्तीला नियमाप्रमाणे एका बॅगेत ठेवून शव परिक्षणासाठी शवागृहात पाठवण्यात आलं. शव परिक्षणासाठी या रुग्णाचा देह कापण्यासाठी खूणा करून ठेवल्या होत्या. पण त्यानंतर हा मृतदेह चक्क घोरत असल्याचं फॉरेन्सिक एक्सपर्टच्या लक्षात आलं. तसंच या मृतदेहाची हालचालही सुरू झाली. त्यानंतर ही बॉडी त्वरीत आत्पकालीन विभागात हलवण्यात आली. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या उपचारांना रुग्ण चांगलं प्रतिसादही देत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा - चक्क भुताच्या शोधात ‘तो’ पोहोचला आमदार निवासात
दरम्यान, तीन डॉक्टरांनी तपासल्यानंतरही एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते हा प्रश्न उरतोच. त्यामुळे या तपासासाठी एका टीमला पाचारण करण्यात आलं असून याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे.