पाकिस्तान संसद परिसरातून खासदारांच्या बुटांची चोरी, घरी जावं लागलं अनवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:52 PM2024-04-22T13:52:03+5:302024-04-22T13:52:49+5:30
चोरट्याने संसद परिसरातून खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांचे असे जवळपास २० बुटांचे जोड चोरले आहेत.
लग्नसमारंभात बूट चोरीला गेल्याचे आपण ऐकले असेल, पण संसद परिसरातून बूट चोरी झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. पाकिस्तानमधील संसद परिसरातून जवळपास २० बुटांचे जोड चोरीला गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या संसदेत बूट चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्याने संसद परिसरातून खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांचे असे जवळपास २० बुटांचे जोड चोरले आहेत.
ही बूट चोरीची बातमी सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहेत. यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करून पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानचे लोक आता गंमतीने बूट चोरी रोखण्याचे उपाय सांगत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बूट चोरीला गेल्यावर संसदेच्या अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. त्यांनी संसदेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना बूट चोरीचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सुरक्षा अधिकारी आता सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या संसद परिसरात एक मशीद आहे. यामध्ये पाकिस्तानचे खासदार, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार नमाज अदा करण्यासाठी जातात. शुक्रवारी नमाजाच्या वेळी शेकडो लोक आपले महागडे बूट मशिदीच्या बाहेर काढून नमाज अदा करण्यासाठी गेले. नमाज अदा करून परते आले, तेव्हा बूटांचे २० जोड गायब होते. यामध्ये पत्रकार, संसदेचे वरिष्ठ अधिकारी आणि काही खासदारांच्या बुटांचा समावेश होता.
बूट गायब झाल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर त्यांना घरी अनवाणी परतावे लागले. याबाबतची माहिती संसदेच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचली. यानंतर संसदेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बूट चोरीला जाताना कोणी पाहिले नाही का? एवढ्या मोठ्या बंदोबस्तात चोर कसे आले? असे विचारले असता, सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी कोणाकडेही याचे उत्तर नव्हते. त्यानंतर अध्यक्षांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना बूट चोरीचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर लोक सोशल मीडियावर विविध कमेंट्स येत आहे. अनेकांनी बूट चोरी होऊ नये, म्हणून काय करावे, अशा टिप्सही दिल्या आहेत. पाकिस्तानमधील एका युजरने सांगितले की, जर तुमच्याकडे महागडे बूट असतील तर एक बूट बाहेर ठेवा आणि दुसरा अन्य कुठेतरी लपवा. चोर भाईजान फक्त एकच बूट चोरत नाही, तो दोन्ही शूज चोरतो. किंवा तुम्ही जिथे जात असाल तिथे एक बूट ठेवा आणि दुसरा सोबत घ्या.