Mahinda Rajapaksa Resigns : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, देशात आणीबाणीच्या काळात राजकीय संकट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:41 PM2022-05-09T16:41:59+5:302022-05-09T17:03:21+5:30
Mahinda Rajapaksa Resigns : श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटातून जात आहे. देशात आणीबाणी लागू आहे. श्रीलंकेत आणीबाणीच्या काळात आता राजकीय संकट निर्माण झाले आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यापूर्वी महिंदा राजपक्षे यांनी एक ट्विट केले आहे.
यामध्ये "श्रीलंकेत भावनांचा जोर वाढत असताना, मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आणि हे लक्षात ठेवण्याचे आवाहन करतो की हिंसाचारामुळे फक्त हिंसाचार पसरेल. आर्थिक संकटात, आम्हाला आर्थिक समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे", असे महिंदा राजपक्षे यांनी म्हटले आहे.
While emotions are running high in #lka, I urge our general public to exercise restraint & remember that violence only begets violence. The economic crisis we're in needs an economic solution which this administration is committed to resolving.
— Mahinda Rajapaksa (@PresRajapaksa) May 9, 2022
महिंदा राजपक्षे यांचे विधान देशात हिंसाचाराच्या घटनांदरम्यान आले आहे, ज्यात किमान 16 लोक जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला, ज्यामुळे पोलिसांना राजधानीत कर्फ्यू लागू करावा लागला. महिंदा राजपक्षे यांचे लहान बंधू आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर देशासमोरील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अंतरिम प्रशासन तयार करण्याचा दबाव आहे.
दरम्यान, महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पार्टीच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र, या दबावाविरुद्ध ते समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली. राजपक्षे यांनी 1 एप्रिल रोजी त्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यानंतर आणीबाणीची घोषणा केली होती.