फेक न्यूज रोखण्यासाठी बनवला कायदा, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 3.77 कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:30 PM2019-05-10T16:30:49+5:302019-05-10T16:35:16+5:30
फेक न्यूज(खोट्या बातम्या) आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे.
सिंगापूरः फेक न्यूज(खोट्या बातम्या) आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. अनेकदा फेक न्यूजचा वापर करून राजकीय नेत्यांसह सामान्यांची बदनामी केली जाते. अशा खोट्या बातम्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. परंतु ते रोखण्यासाठी भारतात ठोस पावलं उचलली गेली नाहीत. पण सिंगापुरात ऑनलाइन पद्धतीनं पसरत असलेल्या खोट्या बातम्या रोखण्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणं हा गुन्हा आहे.
तसेच या कायद्यानुसार सरकारला अशा बातम्या पोर्टलवरून हटवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सिंगापुरात कोणी ऑनलाइन फेक न्यूज दिल्यास त्याला दोषी ठरवण्यात येणार आहे. त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 3.77 कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो. सिंगापुरात विरोधी पक्ष असलेल्या वर्कर्स पार्टीचे खासदार डेनियल गोह यांनी ही माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या विधेयकाच्या बाजूनं 72 मतं पडली आहेत, तर विरोधात फक्त 9 मतं गेली आहेत.
तर दुसरीकडे मानवाधिकार संघटना असलेल्या ह्युमन राइट्सनं सिंगापूर सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. हा कायदा म्हणजे ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखं आहे. गुगलनंही या कायद्याला विरोध केला आहे. या कायद्यानं डिजिटल जगतातला विकास प्रभावित होणार आहे. सिंगापूर अशा पद्धतीचा कायदा बनवणारा पहिला देश आहे. यापूर्वी मलेशियानं अशा प्रकारचा कायदा तयार केला होता, परंतु तिथलं सरकार बदलल्यानंतर 5 महिन्यांतच तो कायदा संपुष्टात आला.