भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरण्यासाठी सिंगापूरची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 03:05 PM2017-11-30T15:05:04+5:302017-11-30T15:08:27+5:30
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे
नवी दिल्ली- दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये आज झालेल्या एका महत्त्वाच्या करारामध्ये सिंगापूरने हा निर्णय जाहीर केला आहे.
मलाक्काच्या सामुद्रधुनीमधून चीन तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो, चीनचे येथिल महत्त्व कमी करण्यासाठी या सामुद्रधुनीमध्ये भारत व सिंगापूरने अधिकाधिक वावर वाढवावा अशी इच्छाही सिंगापूरने व्यक्त केली आहे. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीनच्या आग्नेय आशिया आणि दक्षिण चीन समुद्रातील हालचालींना यामुळे शह दिला जाणार आहे. या कराराबात विचारले असता सिंगापूरचे संरक्षणमंत्री ना एंग म्हणाले, "चांगी नाविक तळाचा भारताने अधिकाधिक वापर करावा अशी आमची इच्छा आहे. एकमेकांना वाहतुकीमध्ये सहकार्य. दोन्ही देशांच्या सागरी सीमांमध्ये पहारा तसेच एकमेकांना मदत करणे या करारामुळे शक्य होणार आहे."
सिंगापूरच्या पूर्वेस 2004 साली हा नाविक तळ उभारण्यात आला. चांगी हवाई तळापासून केवळ दीड किमी अंतरावर असणारा हा नाविक तळ चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3.5 किमी अंतरावर आहे. या तळाचे क्षेत्रफळ 1.28 चौकिमी असून तो समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी 21 मे 2004 साली या नाविक तळाचे उद्घाटन केले होते.